Sunday, June 15, 2014

बुचाचे झाड

माझ्या गंध भरल्या आठवणी
वार्‍यावर अचानक कुठूनसा येणारा तो गंध, खोल श्वास भरून छातीत साठवून ठेवावासा वाटतो. छातीत भरून घेतलेला हा गंध, मग अलगद, मनाला प्रसन्न करीत, मोरपिसागत तरल करून भूतकालात घेवून जातो.



बुचाचे झाड
Botanical Name :Milingtonia Hortiances. Family – Bignoniaceae – Indian Cork tree, नीम चमेली

परवा अशीच कुठे तरी चालले होते. काळोख झाला होता॰ डोक्यात काहीतरी वेगळेच विचार होते. आणि नकळत नाकाला तो गंध जाणवला. पावले रेंगाळली. नकळत थांबून मी तो गंध खोल श्वास घेवून छातीत भरून घेतला. या व्यावहारिक रुक्ष जगातून हा गंध मनाला मोरपीसाची तरलता देवून गेला. हे गंधित मोरपीस मग नकळत मला माझ्या बालपणी घेऊन गेले.

आमच्या पालघरच्या घरासमोरील अंगणात फाटकातून आत शिरल्यावर डावीकडील वईला दोन बुचाची झाडे दिमाखात उभी होती. केशरी गुलमोहोर, कलमी आंबा, राय आवळा, आणि पेरुच्या गर्दीत एरव्ही त्यांचे अस्तित्व लपलेले असे. पण पावसाळा सरता सरता मात्र पांढर्‍या शुभ्र फुलांच्या घोसानी ती लगडून जात. पहाट वार्‍या बरोबर ती फुले टपटपा खाली पडत. खालच्या अर्धवट ओल्या जमिनीवर त्यांचा सडा पडे. सकाळी आजीने लावलेल्या मंगल प्रभात मधील भक्तिगीतांच्या ओळी कानावर पडत जाग येताच, बुचाच्या फुलांचा गंध दिवसाचे स्वागत करीत असे. सुटीच्या दिवशी, आन्हिके आवरताच मी फुलांची परडी घेवून बागेत धूम ठोकत असे. लाल चुटुक  जास्वंद; गुलाबी जास्वंद; निळी इवली गोकर्ण; गुलाबी, पांढरी, जांभळी कोरांटी; पांढरी ऐटबाज तगर; लाल चुटुक गणेशवेल; या सगळ्यात आता मात्र निराळे स्थान असे ते या बुचाच्या फुलांना. ही फुले झाडावर शी दिसतात हा प्रश्न तेंव्हा कधीच पडला नाही. माझी दोस्ती ही या गळून डलेल्या फुलांशी.

      बुचाचे फूल तसे रावडेच. हिंदीत त्याला नीम चमेली म्हणतात. पण याच्यात चमेलीचा नाजुक साजूक पणा नाही, तसेच त्याचा मादक गंध देखील नाही.

      ही फुले म्हणजे, सात्विक, सोज्वळ, सरळसोट मनाची रोखठोक गृहिणी. षोडशेची नखरेल चंचलता किंवा नववधूचा सलज्ज भावविभोरपणा हिच्यात नाही. जे काही आहे ते मनमोकळ, रोखठोक. आत बाहेर असं काहीच नाही. एखाद्या आई प्रमाणे ही फुलं आपल्या सुवासाने सर्व परिसरावर आपल्या मायेची पखरण करीत असतात.

      भरपूर लांब देठाची, पांढरी, घट्ट दुधी फुले. लांबच लांब देठ, आणि त्याच्या टोकाला पावसाळ्यातील सगळा पाऊस पिऊन टचटचीत झालेल्या चार घट्ट पाकळ्या. पाकळ्यांच्या घंटीतून डोकावणारे, एखाद्या पाकळीवर विसवणारे पिवळे धमक केसर. सगळं कसं ठसठशीत. हे फूल शिळे झाल्यावर देखील कोमेजत नाही, फक्त पिवळे पडते. याला आपली सुगंध वाटण्याची जबाबदारी पुर्णपणे माहीत असते.

      तर अशी ही फुले परडी भरून वेचून आणावीत. आजीने त्या लांब देठाच्या फुलांची वेणी करायला शिकवली होती. घरात परत आल्यावर शा मोठमोठ्या वेण्या करून त्या कुलस्वामिनी योगेश्वरीला घालाव्या. त्या पांढर्‍या वेण्यांच्या मधेमधे कधीकधी निळी गोकर्ण, लाल गणेश वेलाचे फूल खोवावे. अवघे देवघर देखणे होऊन जात असे. आणि माझ्या बुचाच्या फुलांचा गंध तर सगळा परिसर मंगलमय करून टाके.




      एखाद्या कुलीन, कर्त्या स्त्री च्या अस्तित्वाप्रमाणे तो अवघं घर, अंगण व्यापून टाकत असे.

      शी ही माझी बुचची फुलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आले. वसतिगृहात खूप परकं वाटे. घरची खूप आठवण येई. शिक्षण सोडून घरी पळून जवसे वाटे. आईच्या साडीच्या शिवलेल्या गोधडीची ऊब देखील ला तेथे रूळवत नव्हती.

      आणि एक दिवस पावसाच्या शिडकाव्या पाठोपाठ वार्‍यावर तरंगत तो गंध माझ्या पर्यन्त आला. अरे, ही तर माझी बुचाची फुलं. जरा शोध घेतला, तर जाणवले,.......
      वसतिगृहाच्या मागच्या बाजूला, वसतिगृह आणि कोलंबा शाळेच्या मधल्या कुंपणावर हे दोन बुचाचे वृक्ष आहेत. त्यांच्या दूधट पांढर्‍या फुलांच्या घोसांचे वैभव शिरावर मिरवत वार्‍यावर डुलत आहेत. वार्‍याच्या झुळुकेन गोंजारल्यावर आपल्या सुगंधी वैभवाची पखरण खालच्या हिरवळीवर करत आहेत. त्यांचे शेंडे हात हलवत ला सांगत आहेत, अगं इथे बघ तरी. जगात कुठेही जा. तुझ्या स्मृतींमधील मी तुझ्याजवळच असेन. आज पहिल्यांदाच घराला, आईला सोडून थे आली आहेस. पण मी आहेना तुझी साथ द्यायला. मला माहीत आहे तू माझ्या पर्यन्त पोहोचत नाहीस. मी खूप उंच आहेना, माझी फुले एखाद्या उंच आभाळात टांगलेल्या झुंबरातील लोलकाप्रमाणे खूप उंच आहेत. बाळ, तू नाहीस ना  माझ्यापर्यंत पोहोचलीस तरी हरकत नाही. मीच माझी दिव्य लोलकरूपी फुले तुझ्या पर्यन्त आणीन. त्यांच्या रुपानं माझ्या वात्सल्याची पखरण तुझ्यावर करीन. माझा मंद सुगंध तुझ्यावर मायेची शाल पांघरेल.

      आणि यदाकदाचित पुढेमागे आयुष्याच्या प्रवाहात तू जिथे जाशील तेथे मी नसेन. पण तुझ्या स्मृतीतील माझी गंधरूपी शाल मात्र कायम तुला मायेची ऊब देईल.