Saturday, November 4, 2023






 माझं माहेरपण !!!!!!



हल्ली तसं माहेरी जाणं होतच नाही. का ते माहिती नाही. कदाचित लहानपणी ऐकलेल्या बहिणाबाईंच्या ओव्यांप्रमाणे "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" यातील माय मी आहे, आणि कितीही झालं, तरी माझ्या लेकीचं माहेर, हे इतक्या वर्षांनी माझं सासर न राहता माझंच घर झाले ना आता........

असो तर बाबांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी पुष्कळ दिवसांनी माहेरी गेले. हल्ली असं ऐकलं होतं, की आमच्या लहानपणी हिरवीगार बहरलेली आमची बाग, आता ओसाड झाली आहे. पण गाडीतून उतरून फाटकातून आत गेले, आणि नव्यानेच बहरलेल्या एका आंब्याच्या झाडावर झरकन एक भारद्वाज उडत गेला. मला म्हणाला अगं तुझं माहेरचं अंगण तसंच आहे ग!......

घरात शिरले आणि देवघरातून अनंताचा मंद सुगंध येऊन मला अंजारून गोंजरून गेला.

घरात येऊन पंख्याखाली थोडी विसावले, तर माझी वयोवृद्ध आजारी आई माझ्यासाठी सरबताचा पेला घेऊन आली. अगदी तशीच जशी मी 40 वर्षांपूर्वी वसतिगृहात राहत असताना घरी आले की आणत असे तशीच.

थकलेल्या बाबांच्या डोळ्यात मी आल्याने झालेला आनंद पूर्वी दिसायचा तसाच दिसला.

क्षणभर मधली 40 वर्षे झरकन पळून गेली, आणि मी पूर्वीचीच मुलगी झाले. आईच्या मायेत, घराच्या उबेत, आणि अंगणातील फुलांच्या सुगंधात न्हावून निघाले. 

दुपारी वहिनीने केलेल्या स्वयंपाकावर यथेच्छ ताव मारून थोडीशी आडवी पडले, तर इतकी गाढ झोपले की दोन तास कधी सरले कळलच नाही.

दुसऱ्या दिवशी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. अगदी तशीच जशी बालपणी येत असे. दार उघडून बाहेर गेले, तर प्रसन्न गारवा तना मनाला तजेला देवून गेला. त्वरेन परडी घेऊन बागेत गेले, तर पाहता पाहता माझी परडी फुलांनी भरून गेली. 

आणि मला माझं माहेर जसं माझ्या मनाच्या तळात होतं तसंच परत भेटलं!!!!!!?