Saturday, November 4, 2023






 माझं माहेरपण !!!!!!



हल्ली तसं माहेरी जाणं होतच नाही. का ते माहिती नाही. कदाचित लहानपणी ऐकलेल्या बहिणाबाईंच्या ओव्यांप्रमाणे "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" यातील माय मी आहे, आणि कितीही झालं, तरी माझ्या लेकीचं माहेर, हे इतक्या वर्षांनी माझं सासर न राहता माझंच घर झाले ना आता........

असो तर बाबांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी पुष्कळ दिवसांनी माहेरी गेले. हल्ली असं ऐकलं होतं, की आमच्या लहानपणी हिरवीगार बहरलेली आमची बाग, आता ओसाड झाली आहे. पण गाडीतून उतरून फाटकातून आत गेले, आणि नव्यानेच बहरलेल्या एका आंब्याच्या झाडावर झरकन एक भारद्वाज उडत गेला. मला म्हणाला अगं तुझं माहेरचं अंगण तसंच आहे ग!......

घरात शिरले आणि देवघरातून अनंताचा मंद सुगंध येऊन मला अंजारून गोंजरून गेला.

घरात येऊन पंख्याखाली थोडी विसावले, तर माझी वयोवृद्ध आजारी आई माझ्यासाठी सरबताचा पेला घेऊन आली. अगदी तशीच जशी मी 40 वर्षांपूर्वी वसतिगृहात राहत असताना घरी आले की आणत असे तशीच.

थकलेल्या बाबांच्या डोळ्यात मी आल्याने झालेला आनंद पूर्वी दिसायचा तसाच दिसला.

क्षणभर मधली 40 वर्षे झरकन पळून गेली, आणि मी पूर्वीचीच मुलगी झाले. आईच्या मायेत, घराच्या उबेत, आणि अंगणातील फुलांच्या सुगंधात न्हावून निघाले. 

दुपारी वहिनीने केलेल्या स्वयंपाकावर यथेच्छ ताव मारून थोडीशी आडवी पडले, तर इतकी गाढ झोपले की दोन तास कधी सरले कळलच नाही.

दुसऱ्या दिवशी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. अगदी तशीच जशी बालपणी येत असे. दार उघडून बाहेर गेले, तर प्रसन्न गारवा तना मनाला तजेला देवून गेला. त्वरेन परडी घेऊन बागेत गेले, तर पाहता पाहता माझी परडी फुलांनी भरून गेली. 

आणि मला माझं माहेर जसं माझ्या मनाच्या तळात होतं तसंच परत भेटलं!!!!!!?





Wednesday, February 12, 2020

निसर्गाचा संभ्रम

खरंतर डिसेंबर संपता संपता ठीकठिकाणी टॕबूबिया च्या  फुलांचा सडा पडलेला असतो. रस्तेच्या  रस्ते गुलाबी दिसायला लागतात. खूप मनमोहक दृश्य असते. हवेत सुखद गारवा आणि रस्त्याच्या कडेला पडलेले हे गुलाबी सडे. मुंबईहून ठाण्याला जाताना, rather  चेंबूरहून ठाण्याला जाताना रस्त्याच्या कडेला लावलेले टॕबूबिया मुक्तहस्ताने या गुलाबी रंगाची उधळण करत असतात. काय सुंदर दृश्य दिसते !

हे दृश्य  फक्त पंधरा दिवस दिसते.आणि मग नंतर काही दिवसांनी  शुष्कपर्ण झालेल्या, नुसत्या काड्या दिसायला लागलेल्या, सोनमोहराला   कोवळी पोपटी पालवी फुटते. आणि त्या पालवीच्या पाठोपाठ मखमली सोनेरी रंगाच्या कळ्या डोकावायला लागतात. आणि मग मी म्हणते की लागली बरंका वसंताची चाहूल. हवेतला गारवा मात्र कमी व्हायला लागलेला असतो. उष्णता पण वाढायला लागलेली असते.

 यावर्षी मात्र एक-दोनदा ठाण्याला जाणं झालं. पण एक दोन झाड सोडली तर मात्र ही गुलाबी फुलांची उधळण कुठेच दिसली नाही. मला वाटलं की माझ्या स्मरणात काहीतरी चूक होती.
पण काही दिवसापूर्वी बंगलोरला जाणं झालं. बंगलोरला मात्र रस्त्यारस्त्यांवर गल्ल्या गल्ल्यांमध्ये मुक्तहस्ताने उधळण करत असतो हा गुलाबी रंग. हा गुलाबी रंग मुंबईपेक्षा अतिशय सुंदर दिसतो. तो जास्त गडद असतो. पण तिथे देखील यावर्षी हा गुलाबी रंग फारच कमी झाडांना दिसला. आणि तोही उधळण अशी काही खास  करत नव्हता. मनाला खूपच वाईट वाटलं.

माझ्या नव्या घराच्या खिडकीतून  सर्व झाडांचे शेंडे दिसतात. तसेच  खाली काही  सोनमोहर देखील आहेत. त्या सोनमोहरांना काल-परवा पासून कोवळी पोपटी पालवी दिसू लागली. तिथला काटेरी, धुळ माखलेल्या वृक्षांचा नजारा एका हिरव्या पालवीने भरून गेला. तेथे खूपच सुंदर दिसू लागले. आणि आज तर तिथे मला छोट्या छोट्या कळ्या दिसायलाला लागल्या.

म्हणजे यावर्षी टॕबूबियाचं फुलणं राहूनच गेलं की काय.
बहुदा खूप लांबलेल्या पावसाने आणि ऋतुचक्र बदलत गेल्याने ही सृष्टी संभ्रमित झाली आहे.. अजून उष्णता तर सुरू झाली नाही, पण सोनमोहराला मात्र कळ्या आल्यात. कदाचित गुलाबी व्हायच्या अगोदरच ही सृष्टी पिवळी होणार आहे.

 मानवानं निसर्गाच्या साखळीत केलेल्या हस्तक्षेपामुळे हे चक्र बदलून जाते.
हुदा पहिल्यांदा नववधूच्या गाली गुलाबी लाली चढते, आणि नंतर ती पिवळे वधुवस्त्र, हिरवा शालू नेसते. आता तर सृष्टीला फारच संभ्रम पडलेला दिसतोय.

गाल गुलाबी व्हायच्या अगोदरच ही नवयौवना आता पिवळी हिरवी वस्त्रे ल्यायला लागली आहे. कुणाचा बरं दोष हा?

आपण मानवाने निसर्गाच्या, ऋतुचक्राच्या नियमांमध्ये फारच हस्तक्षेप केला आहे. त्यामुळेच हे परिणाम दिसताय.


Sunday, June 15, 2014

बुचाचे झाड

माझ्या गंध भरल्या आठवणी
वार्‍यावर अचानक कुठूनसा येणारा तो गंध, खोल श्वास भरून छातीत साठवून ठेवावासा वाटतो. छातीत भरून घेतलेला हा गंध, मग अलगद, मनाला प्रसन्न करीत, मोरपिसागत तरल करून भूतकालात घेवून जातो.



बुचाचे झाड
Botanical Name :Milingtonia Hortiances. Family – Bignoniaceae – Indian Cork tree, नीम चमेली

परवा अशीच कुठे तरी चालले होते. काळोख झाला होता॰ डोक्यात काहीतरी वेगळेच विचार होते. आणि नकळत नाकाला तो गंध जाणवला. पावले रेंगाळली. नकळत थांबून मी तो गंध खोल श्वास घेवून छातीत भरून घेतला. या व्यावहारिक रुक्ष जगातून हा गंध मनाला मोरपीसाची तरलता देवून गेला. हे गंधित मोरपीस मग नकळत मला माझ्या बालपणी घेऊन गेले.

आमच्या पालघरच्या घरासमोरील अंगणात फाटकातून आत शिरल्यावर डावीकडील वईला दोन बुचाची झाडे दिमाखात उभी होती. केशरी गुलमोहोर, कलमी आंबा, राय आवळा, आणि पेरुच्या गर्दीत एरव्ही त्यांचे अस्तित्व लपलेले असे. पण पावसाळा सरता सरता मात्र पांढर्‍या शुभ्र फुलांच्या घोसानी ती लगडून जात. पहाट वार्‍या बरोबर ती फुले टपटपा खाली पडत. खालच्या अर्धवट ओल्या जमिनीवर त्यांचा सडा पडे. सकाळी आजीने लावलेल्या मंगल प्रभात मधील भक्तिगीतांच्या ओळी कानावर पडत जाग येताच, बुचाच्या फुलांचा गंध दिवसाचे स्वागत करीत असे. सुटीच्या दिवशी, आन्हिके आवरताच मी फुलांची परडी घेवून बागेत धूम ठोकत असे. लाल चुटुक  जास्वंद; गुलाबी जास्वंद; निळी इवली गोकर्ण; गुलाबी, पांढरी, जांभळी कोरांटी; पांढरी ऐटबाज तगर; लाल चुटुक गणेशवेल; या सगळ्यात आता मात्र निराळे स्थान असे ते या बुचाच्या फुलांना. ही फुले झाडावर शी दिसतात हा प्रश्न तेंव्हा कधीच पडला नाही. माझी दोस्ती ही या गळून डलेल्या फुलांशी.

      बुचाचे फूल तसे रावडेच. हिंदीत त्याला नीम चमेली म्हणतात. पण याच्यात चमेलीचा नाजुक साजूक पणा नाही, तसेच त्याचा मादक गंध देखील नाही.

      ही फुले म्हणजे, सात्विक, सोज्वळ, सरळसोट मनाची रोखठोक गृहिणी. षोडशेची नखरेल चंचलता किंवा नववधूचा सलज्ज भावविभोरपणा हिच्यात नाही. जे काही आहे ते मनमोकळ, रोखठोक. आत बाहेर असं काहीच नाही. एखाद्या आई प्रमाणे ही फुलं आपल्या सुवासाने सर्व परिसरावर आपल्या मायेची पखरण करीत असतात.

      भरपूर लांब देठाची, पांढरी, घट्ट दुधी फुले. लांबच लांब देठ, आणि त्याच्या टोकाला पावसाळ्यातील सगळा पाऊस पिऊन टचटचीत झालेल्या चार घट्ट पाकळ्या. पाकळ्यांच्या घंटीतून डोकावणारे, एखाद्या पाकळीवर विसवणारे पिवळे धमक केसर. सगळं कसं ठसठशीत. हे फूल शिळे झाल्यावर देखील कोमेजत नाही, फक्त पिवळे पडते. याला आपली सुगंध वाटण्याची जबाबदारी पुर्णपणे माहीत असते.

      तर अशी ही फुले परडी भरून वेचून आणावीत. आजीने त्या लांब देठाच्या फुलांची वेणी करायला शिकवली होती. घरात परत आल्यावर शा मोठमोठ्या वेण्या करून त्या कुलस्वामिनी योगेश्वरीला घालाव्या. त्या पांढर्‍या वेण्यांच्या मधेमधे कधीकधी निळी गोकर्ण, लाल गणेश वेलाचे फूल खोवावे. अवघे देवघर देखणे होऊन जात असे. आणि माझ्या बुचाच्या फुलांचा गंध तर सगळा परिसर मंगलमय करून टाके.




      एखाद्या कुलीन, कर्त्या स्त्री च्या अस्तित्वाप्रमाणे तो अवघं घर, अंगण व्यापून टाकत असे.

      शी ही माझी बुचची फुलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आले. वसतिगृहात खूप परकं वाटे. घरची खूप आठवण येई. शिक्षण सोडून घरी पळून जवसे वाटे. आईच्या साडीच्या शिवलेल्या गोधडीची ऊब देखील ला तेथे रूळवत नव्हती.

      आणि एक दिवस पावसाच्या शिडकाव्या पाठोपाठ वार्‍यावर तरंगत तो गंध माझ्या पर्यन्त आला. अरे, ही तर माझी बुचाची फुलं. जरा शोध घेतला, तर जाणवले,.......
      वसतिगृहाच्या मागच्या बाजूला, वसतिगृह आणि कोलंबा शाळेच्या मधल्या कुंपणावर हे दोन बुचाचे वृक्ष आहेत. त्यांच्या दूधट पांढर्‍या फुलांच्या घोसांचे वैभव शिरावर मिरवत वार्‍यावर डुलत आहेत. वार्‍याच्या झुळुकेन गोंजारल्यावर आपल्या सुगंधी वैभवाची पखरण खालच्या हिरवळीवर करत आहेत. त्यांचे शेंडे हात हलवत ला सांगत आहेत, अगं इथे बघ तरी. जगात कुठेही जा. तुझ्या स्मृतींमधील मी तुझ्याजवळच असेन. आज पहिल्यांदाच घराला, आईला सोडून थे आली आहेस. पण मी आहेना तुझी साथ द्यायला. मला माहीत आहे तू माझ्या पर्यन्त पोहोचत नाहीस. मी खूप उंच आहेना, माझी फुले एखाद्या उंच आभाळात टांगलेल्या झुंबरातील लोलकाप्रमाणे खूप उंच आहेत. बाळ, तू नाहीस ना  माझ्यापर्यंत पोहोचलीस तरी हरकत नाही. मीच माझी दिव्य लोलकरूपी फुले तुझ्या पर्यन्त आणीन. त्यांच्या रुपानं माझ्या वात्सल्याची पखरण तुझ्यावर करीन. माझा मंद सुगंध तुझ्यावर मायेची शाल पांघरेल.

      आणि यदाकदाचित पुढेमागे आयुष्याच्या प्रवाहात तू जिथे जाशील तेथे मी नसेन. पण तुझ्या स्मृतीतील माझी गंधरूपी शाल मात्र कायम तुला मायेची ऊब देईल.