खरंतर डिसेंबर संपता संपता ठीकठिकाणी टॕबूबिया च्या फुलांचा सडा पडलेला असतो. रस्तेच्या रस्ते गुलाबी दिसायला लागतात. खूप मनमोहक दृश्य असते. हवेत सुखद गारवा आणि रस्त्याच्या कडेला पडलेले हे गुलाबी सडे. मुंबईहून ठाण्याला जाताना, rather चेंबूरहून ठाण्याला जाताना रस्त्याच्या कडेला लावलेले टॕबूबिया मुक्तहस्ताने या गुलाबी रंगाची उधळण करत असतात. काय सुंदर दृश्य दिसते !हे दृश्य फक्त पंधरा दिवस दिसते.आणि मग नंतर काही दिवसांनी शुष्कपर्ण झालेल्या, नुसत्या काड्या दिसायला लागलेल्या, सोनमोहराला कोवळी पोपटी पालवी फुटते. आणि त्या पालवीच्या पाठोपाठ मखमली सोनेरी रंगाच्या कळ्या डोकावायला लागतात. आणि मग मी म्हणते की लागली बरंका वसंताची चाहूल. हवेतला गारवा मात्र कमी व्हायला लागलेला असतो. उष्णता पण वाढायला लागलेली असते.
यावर्षी मात्र एक-दोनदा ठाण्याला जाणं झालं. पण एक दोन झाड सोडली तर मात्र ही गुलाबी फुलांची उधळण कुठेच दिसली नाही. मला वाटलं की माझ्या स्मरणात काहीतरी चूक होती.
पण काही दिवसापूर्वी बंगलोरला जाणं झालं. बंगलोरला मात्र रस्त्यारस्त्यांवर गल्ल्या गल्ल्यांमध्ये मुक्तहस्ताने उधळण करत असतो हा गुलाबी रंग. हा गुलाबी रंग मुंबईपेक्षा अतिशय सुंदर दिसतो. तो जास्त गडद असतो. पण तिथे देखील यावर्षी हा गुलाबी रंग फारच कमी झाडांना दिसला. आणि तोही उधळण अशी काही खास करत नव्हता. मनाला खूपच वाईट वाटलं.म्हणजे यावर्षी टॕबूबियाचं फुलणं राहूनच गेलं की काय.
बहुदा खूप लांबलेल्या पावसाने आणि ऋतुचक्र बदलत गेल्याने ही सृष्टी संभ्रमित झाली आहे.. अजून उष्णता तर सुरू झाली नाही, पण सोनमोहराला मात्र कळ्या आल्यात. कदाचित गुलाबी व्हायच्या अगोदरच ही सृष्टी पिवळी होणार आहे.मानवानं निसर्गाच्या साखळीत केलेल्या हस्तक्षेपामुळे हे चक्र बदलून जाते.
बहुदा पहिल्यांदा नववधूच्या गाली गुलाबी लाली चढते, आणि नंतर ती पिवळे वधुवस्त्र, हिरवा शालू नेसते. आता तर सृष्टीला फारच संभ्रम पडलेला दिसतोय.
गाल गुलाबी व्हायच्या अगोदरच ही नवयौवना आता पिवळी हिरवी वस्त्रे ल्यायला लागली आहे. कुणाचा बरं दोष हा?
आपण मानवाने निसर्गाच्या, ऋतुचक्राच्या नियमांमध्ये फारच हस्तक्षेप केला आहे. त्यामुळेच हे परिणाम दिसताय.
No comments:
Post a Comment